मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार होण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गामुळे वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असून, पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भाचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.
या नव्या प्रस्तावित मार्गाची एकूण लांबी ११८ किलोमीटर असून, त्यातील ८५.३८ किलोमीटरचा टप्पा चारोटी ते इगतपुरी दरम्यान बांधला जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे वाढवण ते इगतपुरीचा प्रवास अवघ्या एक तासात पूर्ण होणार असल्याने औद्योगिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक–
या प्रस्तावित महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सोविल कन्सल्टन्सी फर्म या खासगी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कंपनी लवकरच प्रकल्पाचे सर्व तांत्रिक आणि आर्थिक पैलूंचा अभ्यास करून आराखडा सादर करणार आहे.
वाढवण बंदर – देशातील नैसर्गिक संपदा असलेले प्रमुख ठिकाण-
वाढवण हे बंदर पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असून, भारत सरकारच्या बंदर विकास योजनेतील एक महत्वाचा घटक आहे. हे नैसर्गिक बंदर २० मीटरपेक्षा अधिक खोल समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे, जेथे मोठ्या मालवाहू जहाजांचे संचालन सहज शक्य आहे. १४४८ हेक्टर जागेवर भराव टाकून हे बंदर उभारण्यात येत आहे.
औद्योगिक विकासाला चालना-
या नव्या द्रुतगती मार्गामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम आणि उत्तर भागातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, तसेच लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चात घट होईल. विशेषतः समृद्धी महामार्गाला समुद्रमार्गाने जोडले जात असल्याने महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.